पुणे जिल्ह्यातील भिगवण प्रकरणात एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट समोर आला आहे. अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच अझर शेख अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला आहे. या अटकेमुळे संपूर्ण प्रकरणाला आता निर्णायक वळण लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अवैध वाळू उपसा प्रकरणात महसूल अधिकाऱ्यावर हल्ल्याचा गंभीर गुन्हा दाखल असलेला अझर शेख गेल्या काही वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत त्याला आणि त्याचा साथीदार युवराज मेंगावडे याला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, भिगवण येथे काही दिवसांपूर्वी गाजलेल्या तरुणीला पळवून नेण्याच्या प्रकरणाशी त्याचे कौटुंबिक संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो सख्खा चुलता असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच अझर शेखवर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, भिगवण प्रकरणात सुरुवातीला अपहरणाचा दावा करण्यात आला असला तरी तपासात तरुणी स्वतःच्या इच्छेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र नंतर न्यायालयात जबाब बदलल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
अझर शेख याला लवकरच दौंड न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. या अटकेनंतर भिगवण प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




