आमिर खानच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची मिश्किल फटकेबाजी; उत्तरांनी रंगली महामुलाखत

0
2



मुंबई : गेटवे ऑफ इंडिया परिसरात आयोजित भव्य सोहळ्यात राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील सर्वात चर्चेचा विषय ठरली ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष महामुलाखत. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी ही मुलाखत घेतली असून, त्यातील हलकाफुलका संवाद आणि मिश्किल टिप्पणींमुळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आमिर खान यांनी एक रंजक खेळ मांडला. आपल्या चित्रपटांतील प्रसिद्ध पात्रांची नावे सांगत त्या पात्राचा स्वभाव कोणत्या राजकीय नेत्याशी मिळताजुळता आहे, हे फडणवीसांनी सांगायचे होते. या खेळाला होकार देताना फडणवीस यांनी “मला या खेळात लाईफलाईन मिळायला हवी,” अशी मिश्किल अट घातली.
‘लगान’मधील भुवन या जिद्दी पात्रासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. ‘कयामत से कयामत तक’मधील रोमँटिक राजसाठी त्यांनी सहकारी गिरीश महाजन यांची निवड केली. ‘थ्री इडियट्स’मधील हुशार रांचो आणि ‘सरफरोश’मधील धाडसी एसपी राठोड या भूमिकांसाठी मात्र त्यांनी स्वतःचेच नाव घेत हशा पिकवला. तर ‘दंगल’मधील महावीर सिंग फोगट, ‘रंग दे बसंती’तील डीजे आणि ‘तारे जमीन पर’मधील निकुंज सर या पात्रांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले.


काही पात्रांच्या बाबतीत मात्र त्यांनी नाव टाळत राजकीय सस्पेन्स कायम ठेवला. ‘पीके’ आणि ‘गजनी’मधील पात्रांबाबत विचारले असता फडणवीस आणि शिंदे दोघेही एकमेकांकडे पाहत हसले. “हे नाव नंतर सांगू,” असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांमध्ये मोठा हशा पिकवला. या दिलखुलास संवादामुळे मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here