जतेत सभापतीपदी अर्चना पाटील,उपसभापतीपदी रविकुमार बगली बिनविरोध

0
2

जत पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सौ.अर्चना नाथा पाटील यांची तर उपसभापतीपदी रविकुमार बगली यांची बिनविरोध निवड झाली. विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध पार पडली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपला मोठे राजकीय यश मिळाले आहे.

जत पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सभापती व उपसभापती पदांसाठी अनुक्रमे सौ. अर्चना नाथा पाटील आणि रविकुमार बगली यांचे अर्ज एकमेव राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला.

जत पंचायत समितीत आमदार गोपीचंद पडळकर तसेच नगराध्यक्ष डॉ.रविंद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पंचायत समितीच्या एकूण संख्याबळात भाजपचे १२ सदस्य, काँग्रेसचे ४ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे २ सदस्य आहेत. या संख्याबळामुळे सभापती आणि उपसभापती पदांवर भाजपचा दावा मजबूत होता.

नवनिर्वाचित सभापती सौ. अर्चना नाथा पाटील यांनी जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व शेतीविषयक प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपसभापती रविकुमार बगली यांनीही सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here