धाराशिव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असताना धाराशिव जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत अत्यंत रंजक घडामोड घडली. दोन्ही आघाड्यांना समान मते मिळाल्याने निर्माण झालेला पेच अखेर ‘ईश्वरचिठ्ठी’ काढून सोडवण्यात आला. या नशिबाच्या कौलात महायुतीच्या उमेदवारांना यश मिळाले आणि पंचायत समितीची दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्या पारड्यात पडली.
कळंब पंचायत समितीच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मतदानानंतर दोन्ही गटांचे संख्याबळ समान ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर नियमानुसार ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. या प्रक्रियेत महायुतीला नशिबाची साथ मिळाली आणि महाविकास आघाडीला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, केवळ कळंब पंचायत समितीपुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि लोहारा पंचायत समित्यांवरही महायुतीने विजय मिळवत आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली आहे. या विजयामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व अधिक दृढ झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विजयानंतर तुळजापूर येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिरात जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
या प्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, हा विजय स्थानिक जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
टीप : बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) असून सादरीकरणासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




