जत : तालुक्यातील डफळापूर येथे बाजारपेठेतील महत्त्वाच्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या विकासकामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच प्रवाशांना अधिक सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
डफळापूर बाजारपेठेतील हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे व्यापारी, नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत होती. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात होती.
माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून भूमिपूजनाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम केल्याशिवाय विकासाला गती मिळू शकत नाही. त्यामुळे अशा कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास माजी समाजकल्याण सभापती आकाराम दादा मासाळ, पंचायत समिती सदस्य महेश गावडे, भाऊसाहेब दुधाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय दादा चव्हाण, माजी मार्केट कमिटी संचालक अभिजीत दादा चव्हाण, सरपंच सुभाष गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच देवदास पाटील, गुलाब शिंदे, भारत गायकवाड, विशाल पाटोळे, विजय संकपाळ, मोहन माळी, प्रवीण कोष्टी, संतोष बंडगर, अशोक सवदे, अमित शांत, उत्तम संकपाळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या कामामुळे डफळापूर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




