जत : जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, मुचंडी, उंटवाडी आणि पाच्छापूर परिसरात काल झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, आंबा आणि लिंबू यांसारखी पिके अक्षरशः उध्वस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने त्यांच्या पुढील हंगामाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिर दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीने दुहेरी संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या मनातील वेदना पाहून त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. “या कठीण काळात तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत,” असा दिलासा त्यांनी दिला.
यावेळी नायब तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार पडळकर यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अशा संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही शासनाची जबाबदारी आहे. नुकसानभरपाईसह शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जत तालुक्यातील रावळगुंडवाडी परिसराची पाहणी करताना आमदार गोपीचंद पडळकर,जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी,महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी.




