जत : तालुक्यातील डोर्ली येथे तेरावर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जत तालुक्यात वास्तव्यास असलेले मूळ उत्तर प्रदेश येथील एक व्यक्ती पोल्ट्री शेडवर काम करतात. त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाला २८ मार्च रोजी सकाळी राहत्या घरातून अनोळखी व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
घटना लक्षात येताच मुलाच्या नातेवाईकांनी परिसरात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी जत पोलिस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची फिर्याद दाखल केली.
घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.




