“पाणीपट्टी भरली, पण बंधारे कोरडेच!” 

0
12
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: a; hw-remosaic: 0; touch: (0.27222222, 0.27222222); modeInfo: ; sceneMode: Hdr; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 79.52798; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

— बेंळूखीत जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारावर शेतकऱ्यांचा संताप 

डफळापूर : बेंळूखी (ता.जत)  पाणीपट्टी भरूनही वेळेवर व पुरेसे पाणी न मिळाल्याने बेंळूखी परिसरातील शेतकऱ्यांचा संताप तीव्र झाला आहे. जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारामुळे ऐन पिकांच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. “पैसे घेतले, पण पाणी दिले नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करत आहेत.

बेंळूखीतील जिल्हा परिषद शाळेमागील तसेच संदानंद मंदिराजवळील दोन बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी सुमारे १० हजार रुपये वर्गणी काढून भरले होते. याशिवाय अधिकृत पाणीपट्टीही भरली होती. मात्र पाणीपट्टी भरून तब्बल एक महिन्यानंतर पाणी सोडण्यात आले, तेही अत्यल्प प्रमाणात. परिणामी दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत.

विशेष म्हणजे शेवटचा बंधारा भरण्यापूर्वीच पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे आधीच टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत. ऊस, भाजीपाला व इतर नगदी पिकांसाठी आवश्यक असलेले पाणी न मिळाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात वर्गणी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांनाही इतर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. “पैसे गोळा करूनही पाणी नाही, मग जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्याबाबत कोणतेही स्पष्ट वेळापत्रक किंवा आदेश नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागणीनुसार पाणी देणे हे धोरण असतानाही प्रत्यक्षात किती पाणी सोडले जाते, कधी बंद केले जाते, याबाबत कोणतीही पारदर्शकता नाही. त्यामुळे विभागाचा कारभार पूर्णपणे विस्कळीत आणि निष्क्रिय असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या गंभीर परिस्थितीत तात्काळ पाणीपुरवठा सुरू करून बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

बेंळूखीतील शेवटचा बंधारा असा अर्धवट भरला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here