जत : जत तालुक्यातील खंडनाळ येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्ष, कांदा आणि मक्का या प्रमुख पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आमदार पडळकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. अनेक ठिकाणी उभ्या पिकांची पूर्णतः हानी झाल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः डाळिंब व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यावेळी त्यांनी जतचे प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, कृषी अधिकारी, सर्कल व तलाठी यांच्यासोबत बैठक घेत बाधित भागांचा आढावा घेतला. तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच पंचनामे पारदर्शक व अचूक पद्धतीने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणे अत्यंत आवश्यक असून शासनाच्या माध्यमातून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू,” असे आश्वासन आमदार पडळकर यांनी दिले.
या पाहणीवेळी जतचे प्रांताधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खंडनाळ (ता.जत) येथे अतिवृष्टी व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त डाळिंब, द्राक्ष, कांदा व मक्का पिकांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात पाहणी करत माहिती घेतली.




