नाशिक : दुसऱ्यांचे भविष्य सांगण्याचा दावा करणारा भोंदू बाबा अशोक खरात हा दिवसेंदिवस नव्या गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकत असून त्याच्या विरोधातील प्रकरणे अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशीत त्याच्या अनेक धक्कादायक कारवायांचा उलगडा होत असून सध्या त्याच्यावर एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी तब्बल ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोण्याशी संबंधित आहेत, तर उर्वरित ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान मिळणारी माहिती दिवसेंदिवस अधिक धक्कादायक ठरत असून पोलिसांसमोरही अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. विशेष म्हणजे खरातचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे तपासात गुंतागुंत वाढत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातची प्रकृती खालावत चालल्याची माहिती समोर आली आहे. सततची चौकशी, मानसिक तणाव आणि विविध आजारांमुळे त्याचे वजन झपाट्याने घटले आहे. त्याला जवळपास पाच प्रकारचे आजार असल्याचे सांगितले जात असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र त्याची शारीरिक व मानसिक स्थिती चिंताजनक असल्याचेही समजते. कोठडीत तो हवालदिल अवस्थेत असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी समाजात मोकळेपणाने वावरणारा खरात आज मात्र छोट्या कोठडीत अडकला असून त्याच्या आयुष्यातील हा मोठा बदल मानला जात आहे. त्याच्या विरोधातील गुन्ह्यांची संख्या आणि स्वरूप लक्षात घेता त्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तराचे स्वरूप प्राप्त होत असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरात हा केवळ भोंदू नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या साखळीचा भाग असू शकतो. ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार ते पाच देशांमध्ये हवाल्याच्या माध्यमातून पैशांची उलाढाल केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या कथित व्यवहारांमध्ये केवळ सामान्य नागरिकांची फसवणूक नाही, तर काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ राज्यापुरता मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्तरावर करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हवाल्याच्या व्यवहारांचा संबंध थेट मनी लॉन्ड्रिंगशी जोडला जात असल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर ठरत आहे.
सध्या एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासात आणखी अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे समाजातही संतापाची लाट उसळली असून पीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.




