सांगलीत ‘करेक्ट कार्यक्रम’चा इशारा | आमदार पडळकरांचा विद्यमान खासदारावर निशाणा

0
1

सांगली : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असताना सांगली जिल्ह्यातही राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

सांगलीत आयोजित भाजपच्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना पडळकर यांनी खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. “जत तालुक्याचे अध्यक्षपद ज्यांनी घालवले, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार,” असा इशारा त्यांनी जाहीरपणे दिला. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “जतचे अध्यक्षपद घालवणे एवढे सोपे नाही. ज्यांनी हे घडवले, त्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल.” तसेच 2029 च्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली. “पुढील काळात ते खासदार राहणार नाहीत. त्यासाठी आम्ही जीवाचे रान करू,” असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना पडळकर यांनी सांगलीत दोन लोकसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. 2011 च्या जनगणनेनुसार मतदारसंख्या वाढल्यामुळे भविष्यात विधानसभा मतदारसंघांची संख्याही वाढू शकते, असे त्यांनी सांगितले. “तज्ज्ञांकडून अशा चर्चा सुरू आहेत,” असेही ते म्हणाले.

लोकसभेच्या संभाव्य आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सांगली मतदारसंघ राखीव झाला तरी भाजपचा खासदार निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना 2029 साठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत पडळकरांनी केलेल्या या विधानांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पडळकर यांच्या वक्तव्याला विरोधी पक्षांकडून लवकरच प्रत्युत्तर येण्याची शक्यता असून सांगलीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप-प्रत्यारोप आणखी रंगणार, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here