जत : मागच्या दोन दिवसांपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये कर्नाटक राज्याचा विषय कोणत्यातरी कारणाने समोर येत आहे. दरम्यान आता सिमावादाचा वेगळा मुद्दा समोर आला आहे. जत तालुक्याचे काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटक राज्याच्या कुरापतीची माहिती आज विधानसभेत हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली.
त्यांनी जत पुर्व भागातील ४० गावचा राज्य शासनाकडून विकास झाला नसल्याने ती गावे कर्नाटकात जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार सावंत म्हणाले की, मागच्या काही दिवसांपुर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटक राज्यात सामिल करण्याबाबत वक्तव्य केले आहे. ही ४० गावे कर्नाटकमध्ये सामिल झाल्यास त्यास नंदनवन करण्याचेही बोम्मई यांनी म्हंटले आहे. यावर आमदार सावंत यांनी सवाल उपस्थित केला आहे. बोम्मई यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला कर्नाटक विधानसभेत याबाबत चर्चा केल्याचे सावंत यांनी दावा केला.
बोम्मई म्हणाले, कर्नाटक बेळगावचा एक इंचही भाग सोडणार नाही आणि जत तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकचा भाग व्हायचा ठराव केला तर त्यांचा कर्नाटकात समावेश केला जाईल, असे बोम्मई म्हणाले होते.या वक्तव्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे आमदार सावंत यांनी विधानसभेत मागणी केली. कर्नाटकातील मराठीबहुल सीमाभागाचे समन्वयमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बोम्मई जे बोलले ते कधीच होणार नाही, असे सांगितले.
४० गावांचे १० वर्षांपासून आंदोलन पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा न मिळाल्यास कर्नाटकात सामील होण्याची धमकी देत या ४० गावांनी २०११-१२ मध्ये आंदोलन केले होते, असे सावंत म्हणाले. मात्र ग्रामपंचायतींनी कोणताही ठराव केला नसल्याचे ही सावंत यांनी सांगितले.
४० गावचा विषय पुन्हा चर्चेत
जत तालुक्यातील पुर्व भागातील ही ४० गावांना आजही दुर्लक्षीत आहेत.पाणी,रोजगारसह अनेक प्रश्न कायम आहेत.त्यामुळे २०११-१२ मध्ये या ४० गावांनी आंदोलन करून कर्नाटकात सामील होण्याची परवानगी मागीतली होती.पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.