सांगली : पर्यटनाच्या दृष्टीने चांदोली हे क्षेत्र अधिक विकसीत झाल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी चांदोली अभयारण्यात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देवून येथील लोकांचा आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शिराळा तालुक्यातील सर्व शासकीय इमारती अद्ययावत बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराचा कायापालट झाला आहे. शहराचा आणखी विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देवून नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
शिराळा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारे, तहसीलदार गणेश शिंदे, नगराध्यक्षा प्रतिभा पवार, सभापती मनीषा गुरव, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, अँड. भगतसिंग नाईक, सुरेश चव्हाण, देवराज पाटील, विराज नाईक, राजेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी १९६२ साली स्व. राजारामबापू पाटील यांच्याहस्ते या ठिकाणी इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारत उभारली आहे.
शिराळा पंचायत समितीची इमारत सर्व सोयी सुविधांनी युक्त असून या ठिकाणी सकारात्मक उर्जा घेवून लोकाभिमुख काम करा. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांचे वाकुर्डे योजना पूर्ण करण्याचे स्वप्न आमदार मानसिंगराव नाईक सतत पाठपुरावा करून करत आहेत. त्यामुळे या दोन वर्षात शिराळा तालुक्यातील या योजनेची सर्व कामे पूर्ण होतील. जत, टेंभू योजनेतील काही गावे तेथे पाणी देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सांगली जिल्ह्यातील पुढील पिढीला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आमदार मानसिंगराव नाईक यांनी येत्या अर्थसंकल्पात वाकुर्डे योजनेसाठी भरीव निधी द्यावा, पंचायत समिती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यासाठी निधीची मागणी केली. पंधरा वर्षांपासून बंद असलेली कालव्यांची कामे वेगात सुरू आहेत असे सांगितले.
स्वागत व प्रास्तविक बी. के. नायकवडी, सुत्रसंचलन विजय थोरबोले, अरुण पाटील यांनी केले. प्रदीप कुडाळकर यांनी आभार मानले.
या दौऱ्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिराळा तालुक्यातील चिखली व नाटोली परिसरातील वारणा प्रकल्प अंतर्गत वारणा डावा तीर कालवा किलोमीटर ५१ ते ५३ मधील मातीकाम, बांधकाम अस्तरीकरण कामाची पाहणी केली.