सांगली : महाराष्ट्र शासनाच्या दि. ११ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये विविध योजनांच्या अभिसरणामधून “मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना”राबविण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ज्या नागरिकांची, शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांची मागणी असल्यास त्याबाबतचे अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर करावेत. ग्रामपंचायतींनी रस्त्यांच्या कामांचे आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मंजूरीसह गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. गटविकास अधिकारी यांनी तालुक्यांचा एकत्रिक आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे दि. १५ मार्च २०२२ पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना, मनरेगा व राज्य रोहयो या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करून देणे असा असून त्यासोबतच ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मुलभूत सुविधा निर्माण करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. तसेच शासननिर्णयाप्रमाणे रस्त्यांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता आदेशात नमूद करण्यात आलेला मनरेगा योजनेंतर्गत अनुज्ञेय अकुशल/कुशल निधी प्रचलित पद्धतीनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल तर पूरक कुशल खर्चाची रक्कम राज्य रोहयो अंतर्गत “शेत/पाणंद रस्ते योजनेकरीता अनुदान “ (लेखाशिर्ष-२५०५A ०६७) या लेखाशिर्षातून उपलब्ध करून देता येईल.
या योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे शेत/पाणंद रस्त्यांची कामे घेता येतील. अस्तित्वातील शेत/ पाणंद कच्चा रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे.
या योजनेतून रस्त्यांची कामे घेण्यासाठी आराखडा मंजुरीचे टप्पे पुढील प्रमाणे असतील. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या शेत/पाणंद रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेच्या मंजुरीने ग्रामपंचायत तयार करेल. वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेली प्रत्येक ग्रामपंचायतीची शेत/पाणंद रस्त्यांची यादी गटविकास अधिकारी एकत्रित करतील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची यादी एकत्रित करून आराखडा सचिव (रोहयो) यांच्याकडे सादर करतील. सचिव (रोहयो) हे सर्व जिल्ह्यांच्या प्राप्त आराखड्यानुसार उपलब्ध निधीच्या मर्यादेत पूरक निधी मंजुरीचा प्रस्ताव तयार करून मंजूरीसाठी मा. मंत्री रोहयो यांच्याकडे सादर करतील.
मा.मंत्री रोहयो जिल्हानिहाय, ग्रामपंचायत निहाय, शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक निधी मंजूर करावयाच्या यादीस मान्यता देतील. मान्यता प्राप्त आराखड्यातील सविस्तर अंदाजपत्रके कार्यान्वयीन यंत्रणेचे तांत्रिक अधिकारी तयार करतील व त्यांचे सक्षम अधिकारी अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देतील. तसेच मनरेगाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार सक्षम अधिकारी तांत्रिक मान्यता प्राप्त रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करतील.