दोषी आढळलेल्या युरीया खताच्या दहा विक्री केंद्राचे परवाने निलंबीत

0
4

सांगली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरीया खताच्या  विक्रीत आढळून आलेल्या अनियमिततेची तपासणी करून कृषि विभाग सांगली यांच्याकडून 10 परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. युरिया खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा नोंदवहित साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यासारख्या बाबींची तपासणी करण्यात आली व तपासणीत दोषी आढळलेल्या विक्री केंद्रावर परवाना निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती कृषि विभागातर्फे देण्यात आली.

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाने विक्री केंद्रावर नजर ठेवण्यासाठी एकूण 11 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात तालुका कृषि अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या भरारी पथकामध्ये कृषि विभाग, जिल्हा परिषद कृषि विभाग, वजन मापे निरिक्षक यांचे प्रतिनिधी आहेत. तसेच कृषि विभाग, पंचायत समिती स्तरावर व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात निविष्ठा बाबत तक्रार असल्यास  ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. येत्या खरीप हंगामात कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षता व ठेवावयाचे अभिलेख यांचे मार्गदर्शन कृषि विभाग करत आहे. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही कृषि विभागातर्फे देण्यात आला आहे.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here