सांगली : संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. म्हैसाळमधील उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील ९ लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याचं सांगण्यात आलं होत.
मात्र, या ९ जणांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
या हत्याकांड प्रकरणी दोन व्यक्तीना अटक देखील करण्यात आली आहे. म्हैसाळमधील त्या घरातील लोकांनी आत्महत्या केली नव्हती तर त्या नऊ लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहीती सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.या हत्याकांडाप्रकरणी आब्बास महमंदअली बागवान (वय ४८ वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर)यांना अटक करण्यात आली आहे.संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी घडली होती. एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांच्या परिवाराने एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
हे सर्वजण उच्चशिक्षित होते, पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली होती. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन हे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता.शिवाय ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली की तो घातपात याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते.
या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर गुप्तधनाच्या लालसेपोटी कुटुंबाने पैसे एक मांत्रिकावर लुटवले होते. त्यातून कंगाल होऊन कर्ज झालं असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र आता पोलिसांच्या तपासामध्ये त्या कुटुंबाने आत्महत्या नव्हे तर त्यांची हत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.