कोल्हापूर : पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाच्या महाअंतिम सोहळ्यात (दि.30 जुलै रोजी ) लाभार्थ्यांशी व्हीसीव्दारे संवाद साधला. या महासोहळ्यात देशभरातील निवडक 100 जिल्ह्यासह कोल्हापूरला सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. यावेळी माननीय खासदार धनंजय महाडिक यांची विशेष उपस्थिती होती.
आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर आठ वर्षातील ऊर्जा क्षेत्राची कामगिरी व भविष्यातील नियोजनाच्या हेतूने उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सव दि. 25 ते 30 जुलै 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा करण्यात आला.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी पुर्नोत्थान/सुधारीत वितरण क्षेत्र योजना (Revamped Distribution Sector Scheme) अंमलबजावणीची महासोहळ्यात घोषणा केली. विद्युत वितरण कंपन्यांची पायाभूत संरचना बळकट होऊन आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळावी, हा या योजनेचा उद्देश आहे. 3 लक्ष 5 हजार 984 कोटी रूपये निधीची ही योजना आहे. नवीकरणीय ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांचे लोकार्पण व शुभारंभ केला.
यावेळी बोलताना मा.खा. महाडिक म्हणाले की, मागील आठ वर्षात देशात वीज क्षेत्राचे जाळे विस्तारले आहे. अनेक दशकांपासून अंधारात असलेल्या देशातील 18 हजार 374 गावापर्यंत विक्रमी वेळेत वीज पोहचविण्यात सरकारला यश आले आहे. ऊर्जासंपन्नतेसाठी नवीकरणीय ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. सोलार रूफ टॉप योजना ही पर्यावरणपूरक व वीज बिल कमी होणार असल्याने नागरिकांच्या फायद्याची असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. सोलार रूफ टॉपचे महत्व ओळखून प्रत्येक घर ऊर्जायुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल पोर्टलची सुरूवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा निर्मितीसोबतच ऊर्जेची बचत ही महत्वाची बाब असल्याचे मा.खा. महाडिक यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी मा.श्री. राहूल रेखावार (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), नोडल अधिकारी तथा अधिक्षक अभियंता मा.श्री. अंकुर कावळे, एनटीपीसी लि. चे मा.डी.सुरेश, मा.जि. के.विवेक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. एकात्मिक ऊर्जा विकास योजना,दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती सौभाग्य योजना लाभार्थी पन्हाळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा मा.रूपालीताई धडेल, श्री. गोरखनाथ पवार, श्री.शामराव गायकवाड, श्री.सागर जंगम, श्री. सरदार पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन उप कार्यकारी अभियंता श्री.मुकुंद आंबी यांनी केले.