जत,संकेत टाइम्स : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर आज (ता.३१) राज्यभरात वाजत गाजत गणपती बाप्पांना घराे घरी तसेच सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळात आणलं जात आहे.काेराेनाचे संकट काहीशा प्रमाणात दूर झाल्याने गणेशभक्त आनंदित आहेत. राज्यभरात गणपती बनविल्या जाणा-या कार्यशाळेतून, कारखान्यातून, दुकानातून गणरायांचा जयघाेष करीत बाप्पांना घरी नेलं जात आहे.सांगली जिल्ह्यातही यंदा माेठ्या उत्साहाने गणेशाेत्सव साजरा केला जात आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झालं. घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत भक्तीमय वातावरणात नेलं जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आलेला गणेशोत्सव यंदा मात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. घराेघरी गणपती नेताना बच्चे कंपनी गणपती बाप्पा माेरयाचा जयघाेष करीत आहे. छाेट्या माेठ्या वाहनातून बाप्पा घरी पाेहचताच त्यांची विधिवत पूजा अर्चा केली जात आहे.जिल्ह्यात घरगुती तर सार्वजनिक असे ८० हजार पेक्षा जादा गणपती मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. एकूणच आजच्या गणेश चतुर्थी निमित्त भक्तांचा उत्साह शिगेला पोचला आहे.
गणेशोत्सवाची रोषणाई, आगमन-विसर्जनासाठी लागणारे ढोल, बॅण्जो पथके तसेच देवबाप्पाच्या आराससाठी दररोज लागणारी फुले, सजावटीचे विविध साहित्य, मोदक-लाडू यांसह अन्य विविध साधनांच्या होणाऱ्या विक्रीमुळे व या अकरा दिवसांतील उलाढालीचा आकडा करोडोंच्या घरात जात असल्याने काही प्रमाणात का होईना, अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ यंदा दूर होणार आहेत.
गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक बाब असल्याने सभोवतालच्या इमारतींमधील रहिवाशांकडून तसेच व्यावसायिकांकडून होणारी वर्गणी आणि संभाव्य खर्च यामध्ये तफावत असल्याने उर्वरित खर्चाचा खड्डा भरून काढण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी स्वत:च्या खिशाला झळ देऊ लागले आहेत. कोरोना निर्बंध हटविण्यात आले असले, तरी कोरोनाचे सावट कायम आहे. आजही कोठे ना कोठे कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडतच आहेत. त्यातच मंकीपॉक्सचे भूत नव्याने निर्माण झालेले आहे. पावसाळा असल्याने ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीचे आजार आहेतच.तरीही गणेश आगमनाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.