सांगली : उमदी येथील समता अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी जत, माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयास व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदि उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य यंत्रणेने वेळीच खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ, मिरज येथे उपचारासाठी हलवून योग्य ते औषधोपचार केले. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर आहे. एक दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी स्पष्ट केले.