जत : जत तालुक्याला प्रथम पूर्णत: पाणी मिळाल्याशिवाय पुढे पाणी जाऊ देणार नसल्याची भूमिका भाजपाचे नेते सुनिल पवारसह शेतकऱ्यांनी घेतली असून मिरज,कवठेमहांकाळ येथे जादा पाणी सोडले जात असल्याने जत,सांगोला व मंगळवेढा तालुक्यासाठी कमी प्रमाणात पाणी येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी पुर्ण होत नसल्याने प्रथम जादा दाबाने जत तालुक्याला पाणी सोडा,त्यानंतर पुढे पाणी सोडावे, अशी भूमिका घेत पवारसह काही शेतकऱ्यांनी सांगोल्याकडील पाणी उमदीकडे वळविल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
सुनिल पवार म्हणाले,अवघा जत तालुका दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असताना जतला नेहमीप्रमाणे कमी दाबाने पाणी सोडले जात आहे.वास्तविक पाहता जत तालुक्यासाठी आठमाही ४.९ टीएमसी पाणी आरक्षित असून,जत तालुक्यातील देवनाळ,बिळूर,उमदी कालव्यासाठी किमान ३६० क्युसेस वेगाने पाणी कालव्यातून येणे गरजेचे आहे.पंरतू प्रत्यक्षात जत तालुक्यासाठी सर्व कालव्याना मिळून फक्त १०० क्युसेस वेगाने पाणी येत आहे आणि ते फारच अपुरे पडल्याने कोणत्याही गावाला समाधानकारक पाणी मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांत असंतोष व्यक्त होत आहे.
पवार म्हणाले,मंगळवेढा व सांगोला तालुक्याला पाणी देण्यासाठी किमान ५६० क्यूसेस वेगाने पाणी गरजेचे आहे.पण १०० क्यूसेस वेगाने येणार्या पाण्यात संपूर्ण जत तालुका व सांगोला,मंगळवेढा तालुका अशा तीन तालुक्यांना पाणी देण्याचा प्रयत्नात प्रशासन आहे.शिरढोण,कुचीपर्यंत पाणी दुथडी भरून वाहत आहे.जत तालुक्यात प्रवेश करण्याआधी पाणी कुठे गायब होत आहे ? हे कुणाही अज्ञानी शेतकर्यालाही कळत आहे.
पवार म्हणाले,आज सनमडीतील काही शेतकर्यांनी परजिल्ह्यात जाणारे पाणी अडवून उमदीकडे पाणी वळविले होते. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील जमावाने दबावाचे राजकारण करून पाणी पुन्हा परजिल्ह्यात वळविले आहे.त्यानंतर सनमडी पंचक्रोशीतील शेतकरीही जमावाने चाल करून कँनॉलवर गेले आहेत.यातून वाद वाढण्याची चिन्हे आहेत.वाद टाळण्यासाठी प्रशासनाने ५०० क्युसेस वेगाने पाणी जत,मंगळवेढा व सांगोला तालुक्यासाठी सोडावे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत,असाही इशारा पवार यांनी दिला आहे.
सनमडीजवळ सांगोल्याकडे जाणारे पाणी शेतकऱ्यांनी उमदीकडे वळविले.