सांगली : सांगली, तासगाव, मिरजेतील सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आर. एस. पी. चे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोलाची कामगिरी बजावली. या सार्वजनिक गणेशोत्सव विशेष बंदोबस्तादरम्यान रस्ता सुरक्षा दलाच्या म्हणजेच आर. एस. पी. च्या जवळपास 255 विद्यार्थी व शिक्षक, अधिकारी यांनी काम केल्याची माहिती वाहतूक सुरक्षा दलाचे जिल्हा समादेशक अनिल शेजाळे यांनी दिली.
सांगली, तासगावच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. तसेच, मिरजेच्या गणेशोत्सवात मोठमोठ्या कमानी आकर्षक असतात. सांगली, मिरज शहरात मोठ्या प्रमाणात आरास व देखावे पाहण्यासाठी स्त्रिया व लहान मुले, तरूण येत असतात. बहुसंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपली वाहने घेऊन शहरात येत असतात. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीत अलोट गर्दी असते.
यासंदर्भात श्री. शेजाळे म्हणाले, गणेशोत्सव व गणपती विसर्जन दरम्यान होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीवर, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदतीसाठी आरएसपीचे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी नेहमीच तत्पर असतात. त्या अनुषंगाने आर. एस. पी. चे अधिकारी विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम बजावतात. यावर्षी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सुरक्षा दलाचे 32 अधिकारी व डी.आय. यांनी योगदान दिले.सांगली संस्थानच्या पारंपरिक ढोल ताशांच्या मिरवणुकीत रस्ता सुरक्षा दलाचे म्हणजेच आर एस पी चे 200 विद्यार्थी व शिक्षक, अधिकारी तसेच तासगावच्या रथोत्सव दरम्यान आरएसपीचे 55 शालेय विद्यार्थी यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील विशेष बंदोबस्तादरम्यान काम केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि अण्णासाहेब जाधव, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी या बालसैनिकांच्या विशेष कामाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आर एस पी चे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी यांनी सहकार्य केल्याने विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत पार पडण्यास मदत झाली.