सांगली शहर व जिल्ह्यात सकाळी मोठ्या प्रमाणावर धुके पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संपूर्ण जिल्ह्यातच पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ असणार आहे.
गुरूवार(ता.२३) पासून शहरात सकाळी धुके आणि ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. दुपारनंतर आकाश अंशतः निरभ्र होत असले तरी पाऊस सदृष्य वातावरण दिवसभर पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. २६) राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.
यातच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.नैर्ऋत्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वरील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारी (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.