सांगली : विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. या यात्रेंतर्गत दि. 10 डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात 256 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली आहे.
प्रधानममंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन पात्र गरजू व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीत व्हॅनच्या माध्यमातून उपस्थितांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करून, योजनांचा लाभ घेणे अपेक्षित आहे. याबद्दल ठिकठिकाणचे लाभार्थी आभार व्यक्त करताना दिसत आहेत.
मयुरी सचिन संकपाळ (बुधगाव, ता. मिरज) यांची कन्या आर्विका सचिन संकपाळ हिला क्षयरोगाची लागण झाली होती. त्यावेळी तिच्या औषधांचा खर्च शासनाकडून मोफत झाल्यामुळे त्यांना मोठी मदत झाल्याचे त्या सांगतात. मयुरी संकपाळ म्हणाल्या, प्रति महिना ५०० रूपये याप्रमाणे सहा महिने मदत मिळाली. तिच्या औषधोपचारासाठी मदत झाल्यामुळे आम्ही शासन व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो.
भारत रामचंद्र पाटील (बिसूर, ता. मिरज) यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधून लाभ झाला. ते म्हणाले, या योजनेतून मला आतापर्यंत १५ हप्ते मिळाले आहेत. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये मदत या योजनेतून मिळते. विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत गावात रथयात्रा आली असल्याबद्दल समाधान व्यक्त करून या माध्यमातून इतरांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.