गांजाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद | तासगाव पोलिसांची कारवाई : 14 लाखांचा मुद्देमाल जप्त : ओडीसा ‌‘कनेक्शन’ची शक्यता

0
4
तासगाव : ओडीसा या राज्यातून गांजाची तस्करी करून हा गांजा तासगाव तालुक्यात विक्रीस आणणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 34 किलो 505 ग्रॅम गांजा, देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल, एक चारचाकी गाडी असा 13 लाख 99 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील 4 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ओडीसा राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी व विक्री होत आहे. याप्रकरणी ठिकठिकाणी पोलीस कारवाई करत आहेत. कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळक्याकडून आपण हा गांजा ओडीसा राज्यातून आणत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या टोळीकडून तासगाव तालुक्यातही गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गोपनिय सुत्रांकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव – भिवघाट रोडवर बिरणवाडी फाट्याजवळ सापळा लावला. यावेळी मनोज संभाजी नागणे (वय 36, रा. महूद बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा रस्त्याकडेला मोटारसायकलवर पिशवित गांजा घेऊन थांबल्याचे दिसून आले. त्याच्याकडून 4 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
नागणे याच्याडून पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याने आपल्या मित्राच्या घरी महूद बुद्रुक येथे 8 किलो गांजा ठेवल्याची माहिती दिली. हा गांजाही पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर नागणे याने हा गांजा ज्ञानेश्वर महादेव काळे (रा. नरसिंगपूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर काळे याला महूद बुद्रूक येथून ताब्यात घेण्यात आले. त्याकडे अधिक तपास केल्यानंतर वैष्णव नाना लावंड (रा. नरसिंगपूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची कबुली त्याने दिली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज हद्दीत पंचवीस चार लवंग याठिकाणी सापळा रचून वैष्णव लावंड व त्याचा साथीदार अजय हणमंत काळे व त्यांच्याकडील एम. एच. 01, सी. व्ही. 4418 ही चारचाकी गाडी जप्त केली. यावेळी वैष्णव लावंड याच्याकडे कमलेला लावलेले गावडी पिस्तूल तसेच गाडीतील 22 किलो 450 ग्रॅम गांजा जप्त केला.
याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 34 किलो 505 ग्रॅम गांजा, दुचाकी, चारचाकी, गावडी पिस्तूल, जिवंत काडतुसे असा सुमारे 13 लाख 99 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे सतिश माने, अमरसिंह सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव योगाश जाधव, कपिल खाडे, सुहास काबुगडे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली.
गांजा तस्करांच्या टोळीने केला पोलिसांचा पाठलाग..!
याप्रकरणात गांजा तस्करांच्या टोळीचा तपास करण्यासाठी तासगाव पोलिसांचे पथक अकलूज हद्दीतील पंचविस चार लवंग याठिकाणी पोहोचले. याठिकाणी संशयितांवर कारवाई करुन त्यांना घेऊन येत असताना गांजा तस्करांच्या टोळीने तासगाव पोलिसांच्या पथकाचा पाठलाग केला, अशी धक्कादायक माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी दिली.
गांजा तस्कारांचे टोळके सराईत : राजू अन्नछत्रे
तासगाव पोलिसांनी अटक केलेले गांजा तस्करांचे टोळके सराईत आहे. ओडीसा राज्यातून आपण गांजा आणत तो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विकत असल्याची कबुली या टोळक्याने दिली आहे. या टोळीतील मनोज नागणे, ज्ञानेश्वर काळे व वैष्णव लावंड यांच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी दिली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here