जत : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चालु शैक्षणिक वर्षापासून दोन नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी दिली. यावेळी पदव्युत्तर विभागाचे समन्वयक व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, राजे रामराव महाविद्यालय हे जत तालुक्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालय असून कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए व पदव्युत्तर रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अभ्यासक्रमासह विविध नाविन्यपूर्ण गोष्टी व शैक्षणिक उपक्रम राबवून हे महाविद्यालय नावारूपास येत आहे. महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या पाहता हे दोन अभ्यासक्रम सुरू करणे अत्यावश्यक होते. महाविद्यालयाने सर्वप्रथम सप्टेंबर २०२३ मध्ये शिवाजी विद्यापीठास नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव अर्ज पाठवला होता. त्यानंतर विद्यापीठाने तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पाठवला. राज्य शासनाने मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन या दोन नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली. यामध्ये एमएस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री (सेंद्रिय रसायनशास्त्र) व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) या दोन अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसे पत्र महाविद्यालयास मिळाले असल्याची माहिती यावेळी प्राचार्यांनी दिली. यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.कृष्णा रानगर व प्रा.जाकीरहुसेन मुलानी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
राजे रामराव महाविद्यालयामध्ये एमएस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या दोन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी व सांगली विभागप्रमुख प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी अभिनंदन केले.