म्हैसाळ : सध्या कोयना धरण व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीपात्राबाहेर पडली आहे. वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने आज म्हैसाळ योजनेचे दोन पंप सुरू केले.
दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो. वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये या कारणासाठी पाटबंधारे विभागाने जत, सांगोला या भागासाठी पाणी उपसा सुरू केला आहे. जत, सांगोला भागातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती. त्यानुसार पाणी सोडले आहे. जसजशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.