तासगाव(अमोल पाटील) : सांगली जिल्ह्याचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. तासगाव येथील काँग्रेस भवनवर त्यांना शुभेच्छा देणारा एक फलक मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांचा फोटो वगळला आहे. तर येळावीच्या विशाल पाटील यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. त्यामुळे तासगाव तालुका काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सांगली लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपचे संजय पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना धुळ चारत लाखाच्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी छुपा पाठिंबा देत मदत केली. त्यामुळेच विशाल पाटील यांना संजय पाटील यांचा पराभव करणे शक्य झाले.
लोकसभा निवडणुकीत तासगाव तालुका काँग्रेसची भूमिका मात्र संशयास्पद होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी या निवडणुकीत विशाल पाटील यांना मदत केली नसल्याची चर्चा आहे. तासगाव बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीतही महादेव पाटील यांनी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली. ते बाजार समितीचे संचालकही झाले.
बाजार समितीचा कारभार व आमदार सुमन पाटील घराण्यावर त्यांनी टोकाची टीका केली. शिवाय ज्यावेळी विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंड करून वेगळा मार्ग स्वीकारला त्यावेळी महादेव पाटील यांनी विशाल पाटील यांना परत काँग्रेसमध्ये घेऊ नये. त्यांना जर परत काँग्रेसमध्ये घेतले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काय.. आम्ही काय करायचे.., असा सवाल सांगली येथील बैठकीत व्यक्त केला होता.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महादेव पाटील यांनी विशाल पाटील यांना मदत केली नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तासगाव काँग्रेस भवन समोर महादेव पाटील यांनी बॅनर लावून विशाल पाटील यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता विशाल पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा तासगावात एखादा – दुसरा बॅनर लागला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात नूतन खासदारांना शुभेच्छा देणारा एकही बॅनर लावला नाही.
मात्र, तासगाव काँग्रेस भवनसमोर लागलेला एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. येळावीच्या विशाल पाटील यांचा फोटो लावून हा बॅनर लावला आहे. मात्र, या बॅनरवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे तासगाव तालुका काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे का, असा सवाल व्यक्त होत आहे. महादेव पाटील यांना डावलून एखादा वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, तासगाव तालुक्यात काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची सत्ता आहे. तालुक्यातील अनेक गावात काँग्रेसचे हक्काचे कार्यकर्ते नाहीत. तासगाव तालुक्यात पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्या एकाही कार्यकर्त्याने तालुकाभरात काँग्रेस वाढवण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसचे दयनीय अवस्था असताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांचाच फोटो बॅनरवरून वगळल्याने आता आहे त्या काँग्रेसमध्येही दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे.