बदलापूर आणि दौंड येथील शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील शाळेत तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकानेच या मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात शाळेच्या शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर, पुणे) असे शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या विकास मंडळची मुळशी तालुक्यातील आंदगाव या ठिकाणी एक शाळा विद्या विकास मंदिर या नावाने आहे. या संस्थेच्या कार्यकारी समितीला माहिती मिळाली की, संबंधित शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना शारीरिक मारहाण व शिकवताना अश्लील भाषेत बोलतो. तसेच शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतो.
शाळेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जालिंदर कांबळे याने शाळेत खेळणाऱ्या एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधत तिला मिठी मारली. त्या वेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडले. कांबळे हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जाऊन कानामध्ये बोलायचा व मोठ्याने कानात ओरडायचा. तसेच हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत असे व त्यास विरोध केल्यास मुलींना मारहाण करायचा. शाळेतील विद्यार्थिनींना लज्जा उत्पन्न होते.अशा स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत.