राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत येथे आज जनता दरबार भरवला. बारामतीच्या कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात त्यांनी मेळाव्याला संबोधित केलं. तसेच, अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्षप्रवेश पार पडले. अजित पवारांनी आपल्या बारामती दौऱ्यात अखिल तांदूळवाडी वेस तरूण मंडळ आयोजित श्रीमंत आबा गणपती मंडळ, नटराज नाट्य कला मंडळ आयोजित बारामती गणेश मंडळ आणि अनंत युवा प्रतिष्ठान आयोजित “गणेश फेस्टिव्हल २०२४” ला भेट दिली. खासदार सौ. सुनेत्राताई पवार यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित होत्या.
कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे बारामती तालुक्याचे माजी सचिव विक्रम थोरात यांच्या नेतृत्वात श्री.योगेश मोटे, श्री.सचिन थोरात, श्री.संदिप गाढवे, श्री.नितीन चव्हाण यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधीत करताना, “कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्ष चालत याची मला जाणीव आहे. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्यांनी काम नाही केलं तर गडबड होते, हे मान्य केलंच पाहिजे. कोणतीही निवडणूक असो किंवा आजची बैठक असो, कार्यकर्त्यांच्या जिवावरच निवडणूक आणि यश अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या मला कार्यकर्त्यांमुळेच मिळाल्या आहेत” असं अजित पवार म्हणाले.
जनाई-शिरसाई योजनेमुळे अनेकांना लाभ होत असल्याची माहिती दिल्यानंतर अजित पवारांनी ऊस कारखान्यांना आयकर सवलत दिल्याबद्दल केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. बारामती मतदारसंघात 750 कोटी रुपयांपेक्षा अधिकची विकासकामं सुरू आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. “यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत, काही खराब आहेत ते कसे चांगले करायचे ते पाहू. मेडिकल कॉलेज न मागता मिळालं. तुम्ही सांगितलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज असं नाव केलं” अजित पवार यांनी सांगितलं आहे.