मुंबई : आगामी विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली असून त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे. एकीकडे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या जागावाटपाच्या दृष्टीने जोरबैठका सुरू असताना आता स्वराज्य संघटना प्रमुख छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडूनही तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याच दृष्टीने हे तिन्ही नेते सोमवार,९ सप्टेंबरपासून एकत्रितपणे राज्यातील ओल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असून त्या माध्यमातून त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे.
सोमवारपासून नांदेड आणि परभणी जिल्ह्यापासून या नेत्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यास सुरुवात होणार आहे. या पाहणी दौऱ्यात छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासमवेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे हेदेखील सहभागी होणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ओल्या दुष्काळी भागाची पाहणी करून अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी देखील राज्यात तिसऱ्या आघाडीविषयी चर्चा झाली होती. मात्र केवळ चर्चेपलीकडे काहीच घडले नव्हते. लोकसभेवेळी संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे सांगत महायुती आणि मविआला ललकारले होते. मात्र कोल्हापुरात मविआने त्यांच्या वडिलांना छत्रपती शाहू महाराजांना उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी आपली तलवार म्यान केली होती. त्यावेळी वंचित आघाडीने देखील मविआशी काडीमोड घेत स्वतंत्र उमेदवार देण्याचा तर काही ठिकाणी सोयीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र त्यांना इतरांची साथ न मिळाल्याने वंचितकडून मविआ आणि महायुतीला कडवे आव्हान उभे राहू शकले नव्हते. बच्चू कडू यांची लोकसभेवेळची भूमिकादेखील संदिग्ध राहिली होती. महायुतीचा घटक पक्ष असून देखील प्रहार जनशक्ती पक्षाने काही ठिकाणी महायुतीच्या विरोधात काम केले होते. त्यामुळे या सर्व नेत्यांची ताकद विखुरलेली दिसून आली होती. त्यामुळे आता वंचित वगळता हे सर्व नेते विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला सक्षम पर्याय देण्याच्या विचारात आहेत. त्याच दृष्टीने छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. त्यासाठी राज्यातील काही छोट्या मोठ्या राजकीय संघटनांसोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याशीदेखील युती करण्यासाठी या नेत्यांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. त्यात या नेत्यांना यश येते का? आणि राज्यातील जनतेला तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय मिळणार का? ते येत्या काळात दिसून येणार आहे