भाजीपाला घेऊन गावी निघालेल्या दोन युवकांची नाव उलटली. एक पोहत बाहेर निघाला; पण दुसरा अडकला. पाण्यात वाहून जात असतानाच एक झाड आडवे आले अन् त्याचा जीव भांड्यात पडला. या झाडाला पकडून त्याने एक-दोन नव्हे, तब्बल ३६ तास काढले. अंगावर शहारे आणणारी ही आपबिती आहे भामरागडच्या गुंडेनूर येथील दलसू अडवे पोडाडी (२२) या युवकाची. ८ सप्टेंबरला तो लाहेरी येथे गेला होता. परतताना लाहेरी ते बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यात तो अडकला होता. चोहोबाजूंनी घनदाट जंगल, किर्रर्र अंधार अन् धो-धो वाहणारे पाणी यामुळे तो पुरता हादरलाही; पण संकटांनी घेरलेल्या स्थितीत त्याने संयम राखला.
ग्रामस्थ आले मदतीला
नाल्याच्या पुरात अडकलेल्या दलसू अडवे पोडाडी याला बाहेर काढण्यासाठी दोर घेऊन गावातील युवक मदतीला धावले. तब्बल ३६ तासांनंतर त्याला पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. परिसरात अजुनही पूरस्थिती आहे.