तासगाव : तालुक्यातील वायफळे येथे एका पिकअपच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू झाला होता. वृद्धेला धडक दिल्यानंतर चालकाने गाडीसह धूम ठोकली. दरम्यान ही गाडी बलगवडे येथील असल्याचे निदर्शनास आले. ही गाडी डोर्ली येथील बंडू शिंत्रे यांच्याकडे भाड्याने असल्याचे समोर आले. दरम्यान गाडीचा चालक सचिन मंडले याच्याकडे लायसन नव्हते. शिवाय तो दारू ढोसून तर्र होता. त्यामुळे वाहन मालकाने व पोलिसांनी संगनमत करून गाडीचा चालक बदलल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
चार दिवसांपूर्वी वायफळे येथे एक वृद्धा तासगाव – भिवघाट रस्त्याच्या कडेला बसली होती. त्याचवेळी भिवघाटकडून झेंडूची फुले घेऊन येणारे पिकअप वायफळे येथे आले. पिकअपचा चालक सचिन मंडले हा गावात गेला. तेथील देशी दारूच्या दुकानात त्याने दारू ढोसली. त्यानंतर चालक मंडले हा पिकअप घेऊन तासगावच्या दिशेने निघाला.
दरम्यान वायफळे येथील माळबंगला परिसरात एक वृद्धा रस्त्याच्या कडेला बसली होती. मंडले हा दारू ढोसून गाडी चालवत असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्याकडेल्या बसलेल्या वृद्धेच्या अंगावर गाडी घातली. गाडीच्या धडकेत वृद्धा जागीच ठार झाली. तिच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झाला होता. यानंतर गावातील अनेकांनी गाडीचा पाठलाग केला. मात्र गाडी सापडली नाही.
ही गाडी बलगवडे येथील कै. उमेश शिंदे यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे समजते. अपघातानंतर चालक सचिन मंडले याने ही गाडी बंडू शिंत्रे यांच्या घरी डोर्ली येथे आणून लवली. ही गाडी बंडू शिंत्रे यांच्याकडे फुले वाहून नेण्यासाठी भाड्याने देण्यात आली आहे. दरम्यान वायफळेचे सरपंच संतोष नलवडे यांच्यासह गावकऱ्यांना अपघातातील गाडी बंडू शिंत्रे यांच्या घरासमोर उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सरपंच नलवडे यांच्यासह वायफळे येथील अनेकांनी शिंत्रे यांच्या घराकडे धाव घेतली.
त्यावेळी अपघातातील गाडी शिंत्रे यांच्या घरासमोर उभी असल्याचे दिसून आले. गाडीची पाहणी केली असता गाडीच्या खालील बाजूवर रक्त उडल्याचे व मांसाचा तुकडा चिकटला असल्याचे दिसून आले. यानंतर या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना देण्यात आली. वाघ यांनी तातडीने प्रशांत चव्हाण व सुहास खुबीकर या पोलिसांना डोर्ली येथे पाठवले. पोलिसांनी ही पिकअप ताब्यात घेतली.
तर गाडीवर चालक कोण होता? अशी विचारणा बंडू शिंत्रे यांना केली. यावेळी शिंत्रे यांनी गाडीवर सचिन मंडले नावाचा चालक असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंत्रे यांनी पोलीस कर्मचारी चव्हाण व खुबीकर यांना सचिन मंडले यांच्या घरी नेले. मात्र मंडले हा मोबाईल घरी ठेवून पळून गेला होता. त्यामुळे तो सापडला नाही.
दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन मंडले याच्याकडे लायसन नसल्याने तसेच तो दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याने चक्क गाडीचा चालकच बदलण्याचे ठरले. पोलिसांना मूळ चालकाचे नाव व त्याचे घर माहीत असतानाही पोलिसांनी गाडीचा चालक बदलत असताना कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे पोलीस व गाडीचा मालक यांच्या संगनमताने चालक बदलण्याचे कारस्थान झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे.