सोने – चांदीच्या भावात नेहमी चढ उतार होत असली तरी मागील काही महिन्यांपासून यामध्ये घट नव्हे तर प्रतिदिन वाढच होताना दिसत आहे. साहजिकच सोने ७५ हजार ८०० तर चांदी ९१ हजार १०० रुपयांवर पोहचली आहे. तीन महिने लग्नसराईचे मुहूर्त नसताना देखील सोने चांदीचे भाव कमी झालेले नव्हते. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात १७ विवाह मुहूर्त असल्यामुळे दसरा – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पावले खरेदीकडे सराफ पेठेत वळणार आहेत. साहजिकच तोपर्यंत अजून भाववाढ झालेली पहावयास मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे शेअर मार्केटसह म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीस प्राधान्य देणारे देखील सोने – चांदीचे चढे भाव लक्षात घेता त्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत सोने दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र २०२० साली दीपावली पाडव्यानंतर सोने दरात घरात घसरण सुरु होवून सोने प्रतितोळा ४९ हजार रुपयांवर स्थिरावले होते. मात्र अवघ्या तीन वर्षात २०२३ साली सोने दरात चांगलीच तेजी असल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. त्यावेळी सोन्याचा भाव ६१ हजार ८०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ७७ हजार ७०० रुपयांवर गेली होती. अवघ्या एक वर्षाचा आढावा घेतला तर २०२३ ते २०२४ या कालावधीत सोने ७६ हजार तर चांदी ९१ हजाराच्या आसपास गेली आहे. त्यामुळे मागील वर्षी चोख स्वरुपात ज्यांनी सोने चांदी घेतली होती. त्यांना चांगला फायदा झाल्याचे पहावयास मिळाले.
सोने चांदीचे दर कितीही वाढले तरी लग्नसराईमध्ये हमखास सराफ पेठेतून खरेदी करण्यात येते. ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर पर्यंत विवाह मुहुर्त नसल्याने सोने चांदी खरेदी कमी होईल पर्यायाने दर उतरतील असा अंदाज होता. मात्र आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलत्या वातावरणानुसार भाववाढीत काहीही फरक पडला नाही.
चोख सोन्यास मागणी
दागिने खरेदी करण्याचा एक वर्ग असला तरी मागील काही वर्षापासून चोख सोने खरेदी करण्याचा देखील एक वर्ग तयार झाला आहे. काही सराफ व्यावसायिकांनीही याची दखल घेवून नागरिकांनी सोन्यात गुंतवणूक करावी याकरिता आपल्या दुकानात मागील ७५ वर्षात सोने दरात किती वाढ झाली याचा तक्ताच लावला आहे. साहजिकच इतर ठिकाणी गुंतवणूक करताना कित्येकजण सोने – चांदीचा देखील विचार करीत आहेत.
सोने दरात वाढ होण्याची शक्यता
घटस्थापनेपासून येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी खरेदीला मागणी वाढत जाणार आहे. जागतिक घडामोडी पाहता भविष्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने युवा पिढीही गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोने चांदी खरेदीकडे पाहत असल्याने चोख सोने तसेच चांदीला मागणी वाढत आहे.
– समीर गाडगीळ, संचालक पीएनजी