तासगाव : (अमोल पाटील):बस्तवडे (ता. तासगाव) येथील एका प्रकरणाच्या सुनावणीत निकाल सबंधितांच्या बाजूने देण्यासाठी व तशी नोंद घालून देण्यासाठी वायफळेच्या मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांनी 7 हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी वाले यांच्यासह वायफळेचा कोतवाल प्रदिप माने व बस्तवडे येथील खासगी इसम राहुल बाबर याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, याच कामासाठी बस्तवडे येथील एका तत्कालीन तलाठ्याने 6 हजार रुपयांची लाच घेतल्याची तक्रार आहे. संबंधित तलाठ्याने हे पैसे आपल्या एका नातेवाईकाकडून ऑनलाईन घेतले आहेत, असा जबाब तक्रारदाराने ‘लाचलुचपत’ला दिल्याचे समजते. त्यामुळे संबंधित तलाठीही ‘अँटी करप्शन’च्या रडारवर आला आहे. या तलाठ्याची ‘लाचलुचपत’कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
बसतवडे (ता. तासगाव) येथील एका वृद्धेने आपली जमीन आपल्याच तीन दिरांना विकली होती. या खरेदीची नोंद घालण्यासाठी संबंधितांनी तलाठ्यांकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र गावातील एका इसमाने संबंधित वृद्धेचा अंगठा एका कोऱ्या कागदावर घेऊन या नोंदी प्रकरणी तक्रार असल्याचा खोटा अर्ज दिला होता. हा अर्ज संबंधित महिलेने दिलेला नव्हता.
दरम्यान, या वृद्धेच्या तीन दिरांनी हा अर्ज संबंधित महिलेने दिला नसल्याचे मंडल अधिकारी वैशाली वाले यांना सांगितले. मात्र वाले काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी आलेला अर्ज तक्रार रजिस्टरला नोंदवून या प्रकरणी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला, असे समजते. दरम्यान, संबंधित वृद्धेने याप्रकरणी माझी काहीही तक्रार नाही. दिलेला अर्ज माझा नाही, असे मंडल अधिकारी वाले यांना सांगितले. मात्र याप्रकरणी आता सुनावणी घेऊनच निर्णय घ्यावा लागेल, असे वाले यांनी सांगितले.
दरम्यान या सुनावणीत संबंधित तीन दिरांच्या बाजूने निकाल देऊन सातबारा सदरी तशी नोंद करून देण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 7000 रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाले यांच्यासह वायफळेचा कोतवाल प्रदीप माने, बस्तवडे येथील खाजगी इसम राहुल बाबर यांना रंगेहात पकडले.
दरम्यान, या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली असता संबंधित तक्रारदाराच्या एका नातेवाईकांकडून बस्तवडेच्या एका तत्कालीन तलाठ्याने सहा हजार रुपये घेतल्याचे समजते. नोंद घालण्यासाठी हे 6000 रुपये घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात नोंद करून न देताच हा तलाठी दीर्घकालीन वैद्यकीय रजेवर गेला. त्यानंतर त्याच ठिकाणी आलेल्या दुसऱ्या एका तलाठ्यानेही संबंधित व्यक्तींना नोंदीसाठी पैशाची मागणी केली. मात्र गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी संबंधित तलाठ्याला समजावून सांगितले. अगोदरच्या तलाठ्याने पैसे घेतले आहेत. त्यामुळे परत या लोकांना त्रास देऊ नका, असे सांगितले.
त्यामुळे नंतर आलेल्या तलाठ्याने संबंधितांकडून पैसे घेतले नाहीत. दरम्यान ज्या तलाठ्याने सहा हजार रुपये घेतले त्याने संबंधितांचे कामही केले नाही. पैसे घेतल्यानंतर थोड्याच दिवसात हा तलाठी दीर्घकालीन वैद्यकीय रजेवर गेला होता. हा सगळा घटनाक्रम संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितल्याचे समजते. त्यामुळे नोंदीसाठी सहा हजार रुपये घेणारा बस्तवडे तत्कालीन तलाठीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आल्याचे बोलले जात आहे. या तलाठ्याचीही आता कसून चौकशी होण्याचे संकेत मिळत आहेत.
या तलाठ्याचे बँक खाते तपासल्यास त्याने संबंधितांकडून पैसे घेतल्याचे चौकशीत निष्पन्न होईल. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व तहसीलदार अतुल पाटोळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी याप्रकरणी कसून चौकशी करावी. दोषी तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.