अबब.. ६ महिन्यांत १.३२ कोटी ग्राहकांकडून २७.७३ कोटींची बचत | वीजबिलांच्या ‘तत्पर’ भरण्याचा फायदा

0
27

 वीजबिलांच्या तत्पर भरण्यातूनवीजग्राहकांनी वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास महावितरणकडून एक टक्के सवलत दिली जाते. त्याचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील १ कोटी ३२ लाख २५ हजार २९६ वीजग्राहकांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये २७ कोटी ७३ लाख २७ हजार रुपयांची बचत केली आहे. म्हणजेच दरमहा २२ लाख ४ हजार वीजग्राहक तत्पर बिल भरण्यातून प्रत्येक महिन्यात ४ कोटी ६२ लाख २१ हजार रुपयांची बचत करीत आहे. घरबसल्या व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणा करणे सोयीचे झाल्याने प्रॉम्ट पेमेंटच्या एक टक्का सवलतीचा लाभ मिळत असलेल्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महावितरणकडून वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्का सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्ट पेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते. तसेच महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटद्वारे तसेच इतर ऑनलाइन पर्यायांद्वारे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीज बिलांचा भरणा केल्यास ग्राहकांनी वीजबिलात ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर ‘गो-ग्रीन’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बिलासाठी १० रुपये सूट देण्यात येत आहे तर संबंधित महिन्याचे वीजबिल त्याच बिलाच्या देय तारखेच्या मुदतीत न भरल्यास १.२५ टक्के विलंब शुल्क आकारणी केली जाते.

देयकाच्या तत्पर भरण्यातून (प्रॉम्ट पेमेंट) पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ लाख ५२ हजार ३०० वीजग्राहक दरमहा ३ कोटी ६ लाख ७४ हजार रुपयांची बचत करीत आहेत. तर सातारा जिल्ह्यात २ लाख ३० हजार वीजग्राहकांकडून दरमहा २५ लाख २९ हजार ९०० रुपये, सोलापूर जिल्ह्यात १ लाख ६१ हजार ३९८ ग्राहकांकडून दरमहा २७ लाख ४९ हजार ७८० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ९१० ग्राहकांकडून दरमहा ७८ लाख १९ हजार ३६० रुपये आणि सांगली जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५६० ग्राहकांकडून दरमहा २४ लाख ४७ हजार ८७० रुपयांची बचत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जे वीजग्राहक प्रामुख्याने रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरतात ते प्रॉम्ट पेमेंटच्या सवलतीचा अधिक संख्येने लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.

वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यास त्यांना विनाशुल्क प्रत्येक महिन्याच्या वीजबिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे दिली जात आहे. यामध्ये इतर तपशिलासह वीजबिल भरण्याची तारीख देखील नमूद करण्यात येत आहे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ई-मेलची नोंदणी केल्यास दरमहा वीजबिल संबंधित इमेलवर विनाशुल्क पाठविण्यात येत आहे.

प्रत्येक महिन्यात तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) तारखेच्या मुदतीत वीजबिल भरल्यास वीजग्राहकांना आर्थिक बचतीची संधी आहे. तसेच ‘गो-ग्रीन’, ऑनलाइन वीजबिल भरणा यासाठीही वीजबिलात सूट देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here