तुम्हाला ‌रेशनचे नेमके किती धान्य मिळते? | आता मोबाईलवर मिळणार माहिती

0
12

शिधापत्रिकेवरील ठरलेले धान्य कुटुंबनिहाय तुम्हाला मिळतेय का ? तुमच्या कुटुंबाला धान्याचा ठरलेला कोटा किती आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष किती धान्य घेतले, याची माहिती देणारा ‘एसएमएस’ रेशनकार्ड धारकांना मोबाईलवर पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी रेशनकार्डला मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम राज्यभरात सुरू आहे. त्यात रेशनकार्डवरील सर्व सदस्यांचे मोबाईल क्रमांक किंवा किमान एकाचा मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम केले जात आहे. शिधापत्रिकेवरील धान्य ठरलेल्या मापात मिळतेय का, याविषयी बऱ्याच रेशनकार्ड धारकांना शंका वाटते.काही स्वस्त धान्य दुकानदार हे दरमहा ठरलेल्या कोट्यानुसार धान्य देण्यास टाळाटाळ करतात.

 

धान्य आलेले नाही, धान्य एवढेच आलेले आहे, असे नागरिकांना सांगून परत पाठवले जाते. काही वेळा धान्य येण्यास उशीर देखील होतो. मात्र, धान्य आल्यानंतरदेखील जेवढा धान्याचा कोटा मंजूर आहे, तेवढ्या प्रमाणात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी काही नागरिक निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयात येऊन करत असल्याचे परिमंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेशनकार्डधारकांना दरमहा मिळणाऱ्या धान्याचा कोटा किती, प्रत्यक्षात त्यांना किती धान्य मिळाले, याची माहिती देणारा एसएमएस रेशनकार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणार आहे. जर एखाद्या परिस्थितीत त्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे न मिळाल्यास ‘मेरा रेशन’ या अँपद्वारे देखील त्याची माहिती मिळू शकते. या अँपवर आधार कार्ड क्रमांक टाकून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
रेशनकार्डला जे मोबाईल क्रमांक जोडले गेले त त्यांना धान्याचा कोटा आणि मिळालेले धान्य याची माहिती एसएमएसद्वारे पाठविली जात आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, काही कार्डधारकांना चुकीचे एसएमएस जात आहेत. त्यामुळे कार्डधारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याबाबत सरकारने काळजी घ्यायला हवी.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन.
 रेशनकार्डला मोबाईल क्रमांक जोडण्याची प्रक्रिया जवळपास पपूर्ण होत आली आहे. नागरिकांना त्यांना मिळालेला धान्याचा कोटा, त्यांनी प्रत्यक्ष घेतलेले धान्य याची माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्याची सोय केलेली आहे.
– डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here