उमराणी येथील संदीप गणपती बजंत्री (वय.२७) यांच्या खून प्रकरणी विशाल कैकाडी व रविंद्र कैकाडी या दोघांना जत पोलिसांनी २४ तासात अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दिनांक १९ रोजी सायंकाळी मयत संदीप बजंत्री यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
या खूनप्रकरणाने जत तालुक्यात खळबळ उडाली होती. या अमानुष खूनप्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान जत पोलीसांसमोर उभे ठाकले होते. पण पोलिसांनी २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
या खून प्रकरणी विशाल उर्फ विश्वनाथ सिद्धाप्पा कैकाडी (बजंत्री) व रविंद्र उर्फ कुमार कैकाडी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
उमराणी येथील कैकाडी समाजातील लोकांच्या बैठकीत गतवर्षीचे लोक वर्गणीचे पैशांची परत मागणी केल्याच्या कारणावरून वाद उफाळून आला आणि या वादातूनच ही घटना घडली आहे.
जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी गुन्हा घडल्यानंतर २४ तासात या आरोपीना अटक केली. जत पोलिसांनी त्यांना अटक करून या दोघांना जतच्या न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला.





