जतमधील भाजपातील बंडखोरी रोखण्यात का आले अपयश ? | काय‌ म्हणाले चंद्रकांत दादा,जगताप,जमदाडे

0
1002

भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना विधानपरिषद व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांना महामंडळ देण्याचे आश्वासन देवून जत भाजपमधील बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. जगताप आणि जमदाडे यांनी भाजपची ही ऑफर धुडकवल्याने मंत्री चंद्रकांतदादांचे प्रयत्न असफल ठरले. प्रत्येक निवडणुकीत जत विधानसभा मतदारसंघ वेगवेगळ्या घटनांनी चर्चिला जातो. यंदाची विधानसभा निवडणूक भूमीपुत्राच्या मुद्यावरून चांगलीच गाजत आहे.

मुळातच भाजपने बाहेरचा उमेदवार लादू नये अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतली होती. आपली ही भूमिका नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरही मांडली होती. भाजमधून माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, विधानसभा प्रमुख तम्मनगौडा पाटील हे स्थानिक नेते इच्छुक होते. यातच आमदार गोपीचंद पडळकरांची भर झाल्याने उमेदवारी निवडताना भाजपला कसरत करावी लागली.

स्थानिक नेत्यांच्या व कार्यकर्त्यांची मते जाणून न घेताच भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. सर्वांनी एकत्र येऊन हाती बंडाचा झेंडा घेतला. आमदार विलासराव जगतापांनी घेतलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत तम्मनगौडा रविपाटील यांनी बंडखोरी करण्याचे निश्चित झाले, तर या बैठकीकडे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पाठ फिरविली. त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तालुक्यातील कार्यकत्यांची मते आजमावून निर्णय घेण्याचे जाहीर केले, त्यामुळे जमदाडे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

असे असताना जत भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तालुक्याचा दौरा केला. प्रथम त्यांनी आरळी हॉस्पिटल येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली त्यांना पक्षात प्रमुखपद देण्याचे व विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या घरीही भेट देऊन जमदाडे यांनाही महामंडळावर घेण्याचे आश्वासन दिले व अर्ज माघार घेण्याची विनंती केली. चंद्रकांतदादांची ही ऑफर विलासराव जगताप आणि प्रकाश जमदाडे यांनी धुडकावली आहे व आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.या ऑफर धुडकाविण्यामागे स्थानिकांना उमेदवारी न दिल्याचे प्रमुख कारण आहे.त्यामुळे बंड निश्चित झाले आहे.

जगताप म्हणाले चंद्रकांतदादांनी यांनी आज घरी येऊन भेट घेतली हे खरे आहे. त्यांनी मला भाजपमध्ये चांगले पद किंवा विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले, मात्र मी त्याला स्पष्टपणे नकार दिला आहे. आजवर आम्ही भूमिपुत्रास उमेदवारी देण्याची भूमिका पक्षांच्या वरिष्ठासमोर वारंवार मांडली, शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिपुत्रापैकी कुणालाही उमेदवारी द्या अशा प्रकारचा आग्रह धरला होता. पण वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही त्यांनी गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी लादली आहे. आता वेळ निघून गेली आहे आम्ही पुढचे पाऊल उचलले असून आता निवडणूक निश्चितच लढवणार आहोत.

प्रकाश जमदाडे म्हणाले, चंद्रकांतदादांनी आज (शुक्रवार) माझ्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यांनी मला उमेदवारी माघार घेण्याची विनंती केली, तसेच महामंडळावर घेतो असे आश्वासनही दिले, मात्र आम्ही ऑफर मान्य केली नाही. पक्षवाढीसाठी आम्ही योगदान दिले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये तालुक्यातून भाजपला लीड देण्याचे काम केले आहे. काही वरिष्ठांनी माझी उमेदवारी फायनल झाल्याचेही सांगितले होते. आम्हाला डावलून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. हे कार्यकत्यांना मान्य नाही त्यामुळेच येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची मते आजमावून आमची भूमिका जाहीर करणार आहोत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here