जत : शहरातील विठ्ठलनगर येथील तीन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये माजी नगरसेविका वनिता अरुण साळे यांचेही घर फोडले आहे. त्यांच्या घरात २ लाख ७० हजारांची चोरी झाली आहे. जत पोलिसांत नगरसेविक पती अरुण जयवंत साळेंनी गुन्हा दाखल केला आहे.
अरुण साळे हे आपल्या कुटुंबासह विठ्ठलनगर येथे राहतात. रविवारी सकाळी ते नातेवाइकांकडे पुणे येथे गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. तिजोरी फोडून एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये २७ हजारचे चांदीचे दागिने, १ लाख ८० हजाराचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला.
त्यानंतर चोरट्यांनी साळे यांचे शेजारी नामदेव संकपाळ यांच्या घरात चोरी केली. २५ हजारांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, ८ हजारांचे चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण ३३ हजारांचा मुद्देमाल संकपाळ यांच्या घरातून चोरी झाला आहे. यासह भारत तम्मा साळे यांचे तिसरे घर चोरट्यांनी फोडले.साळे यांच्या घरातून १ लाख ५० हजारांची रोकड, पाच तोळ्यांचे दागिन्यांसह १० हजारची दुचाकी चोरली आहे.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
अरुण साळे हे मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास पुण्यातून परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसले. त्यांनी जत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. सीसीटीव्हीत चोरी करताना चोरटे दिसले आहेत. पण, त्यांची अद्याप ओळख पटली नाही. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भेट दिली.