सांगली : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मायलेकावर हल्ल्याची घटना सांगलीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.राजू पाटील (रा. १०० फुटी रस्ता, सांगली), रोहित बाबासाहेब सातपुते, पिंकी रोहित सातपुते (दोघेही रा. गारपीर चौक, रमामातानगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात ताई वाल्मीक साबळे (वय ५५, रा. गारपीर चौक, रमामातानगर, सांगली) यांनी फिर्याद दिली.संशयितांपैकी रोहित सातपुते हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता ११८ (१), ३२४ (२), ३५२, ३५१ (२), ३(५) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
साबळे या आशा कार्यकर्त्या म्हणून काम करतात. साबळे यांच्यावरील हल्ल्याची ही घटना सोमवारी (दि. २५) सायंकाळी पाच वाजता गारपीर चौकात काळे प्लॉटमध्ये घडली. साबळे व संशयितांमध्ये यापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरुन तिघा संशयितांनी ताई साबळे यांच्या मुलाची दुचाकी (एमएच १० एव्ही ९२०४) फोडली. या दुचाकीचे जवळपास १० हजार रुपयांचे नुकसान केले.
रोहित याने कुन्हाडीच्या दांड्याने आशा कार्यकर्ती ताई साबळे यांच्या पायावर चांगलेच वर्मी वार केले. आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.