जत : कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, जत येथे जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीचा जागतिक एड्स दिनाचा विषय होता.“योग्य मार्ग निवडा: माझे आरोग्य, माझा हक्क” (Take the Right Path: My Health, My Right). या उपक्रमाचा मुख्य उद्देश एड्ससंबंधी जागरूकता निर्माण करणे, लोकांमध्ये योग्य आरोग्य निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून देणे आणि आरोग्यासंबंधी हक्कांची जाणीव करून देणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात जत शहरात भव्य रॅली काढून झाली,ज्यामध्ये कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी, शिक्षक आणि आरोग्यसेवक सहभागी झाले. ही रॅली केएम हायस्कूल, जत येथे जाऊन संपली. रॅली दरम्यान, लोकांपर्यंत एड्सविषयी संदेश पोहोचवण्यासाठी पोस्टर, बॅनर्स, आणि घोषवाक्ये देत रॅली काढण्यात आली.केएम हायस्कूल, जत येथे विद्यार्थ्यांनी एड्ससंबंधी माहिती देण्यासाठी एक प्रभावी नाटिका सादर केली.
या नाटकाद्वारे एड्सच्या प्रसाराचे मार्ग, प्रतिबंधक उपाय, आणि एड्सबद्दल असलेले गैरसमज यावर प्रकाश टाकण्यात आला. विशेषतः लोकांनी एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वर्तन कसे करावे, वेळोवेळी वैद्यकीय तपासणी कशी महत्वाची आहे, याबाबत मार्गदर्शन केले गेले.कार्यक्रमात स्थानिक प्रशासन, आरोग्य अधिकारी, तसेच समाजातील प्रमुख व्यक्तींचा सहभाग होता. त्यांनी एड्ससंबंधी असलेला सामाजिक कलंक दूर करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.