जत : नवीन जत तहसील कार्यालय आवारात परवानाधारक स्टॅम्प विक्रेत्यांना स्टॅम्प विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सोमवारपासून दुय्यम निबंधक कार्यालय तहसील कार्यालयात स्थलांतरित होत आहे. आम्हाला तत्काळ सोमवारपर्यंत जागा उपलब्ध करून न दिल्यास जागा मिळेपर्यंत स्टॅम्प विक्री बंद करण्याचा इशारा स्टॅम्प विक्रेत्यांनी दिला आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक व आ. गोपीचंद पडळकर यांना दिलेल्या निवेदनात स्टॅम्प विक्रेत्यांनी नमूद केले आहे की, यापूर्वी तहसील कार्यालय आवारात आम्ही स्टॅम्प विक्रेते स्टॅम्प विक्रीचा व्यवसाय करीत होतो. सदर जागेची तहसीलदार यांच्या आदेशाने कब्जेपट्टी होऊन त्याचा फेरफार नं. ६७१५ आहे. परंतु तहसील कार्यालयाचे नवीन बांधकाम सुरू झाल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय व आम्ही सर्व स्टॅम्प विक्रेते मोरे कॉलनी येथे दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात स्टॅम्प विक्री करीत होतो.
सोमवारपासून सदर कार्यालय नवीन तहसील कार्यालयात स्थलांतरित होत आहे. यापूर्वी आम्ही जागेबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला, पण त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आवारात शासनाने स्टॅम्प विक्रेत्यांना जागा दिलेली असताना जतमध्ये मात्र जागा का दिली जात नाही? हे समजून येत नाही.