जत : जत शहरातील परापरांगत व्यापारी म्हणून मालाणी कुटुंब ओळखले जाते. त्यांच्या शेतीच्या संकल्पनेची दखल घेत नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या तीन दिवसीय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेत मिथिलेश मालाणी यांना ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपण भलं व आपला व्यापार भला, व्यापाराशिवाय दुसरे काही नाही, शेतीचा तर, दूरवरचा संबंध नसतानाही मालाणी कुटुंबातील मार्केटिंगमधून एमबीए केलेल्या मिथिलेशने नवी वाट निवडली. व्यापार बाजूला सारत शेतीला प्राधान्य दिले. जतपासून जवळच रामपूरजवळ साडेतीन एकर शेती घेतली. या शेतीत रासायनिक शेतीला फाटा देत संपूर्ण सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला, इतकेच नव्हे तर शेतात हळद लावून त्याची पावडर करुन ‘हरिताग्राम’ नावाने त्याचे थेट मार्केटिंग सुरू केले आहे.
दुष्काळी जत तालुक्यातील शेतकरी हा कायम नवनवीन प्रयोग करण्यावर आघाडीवर असतो. निसर्गाशी दोन हात करताना शेतीतील उत्पन्न वाढीसाठी केलेले अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. ज्या फोंड्या माळरानावर कुसळे उगवत नव्हती तेथे द्राक्ष, डाळिंब पिकासह मोगऱ्याचा सुगंधही दरवळला आहे. असाच काहीसा वेगळा प्रयोग मिथिलेश मालाणी यांनी केला. कोरोनाच्या कठीण काळानंतर व्यापारपेठेत आलेली मंदीमुळे शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
आई सरिता व वडील हरिष यांना आवडणाऱ्या सेंद्रिय फळांच्या लागवडीची प्रेरणा घेऊन मिथिलेशने सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला. त्यांनी पारंपरिक, रासायनिक शेती बाजूला सारत २०२२ साली सेंद्रिय शेती सुरू केली, अवघ्या दोन वर्षात त्यांनी सेंद्रिय शेतीचा अभ्यास करत आपल्या स्वतःच्या साडेतीन एकराच्या शेतीत सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले.
सांगलीतील हळदीला मोठी मागणी आहे, नेमके हेच हेरून मिथिलेश यांनी सेंद्रिय हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला. हळद पिकासाठी जमीन अतिशय भारी, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता असणारी, भुसभुशीत लागते. यासाठी ओसाड असलेल्या जमिनीत निरनिराळे प्रयोग करुन सेंद्रिय शेतीसाठी लागणारी जमीन तयार केली. त्यानंतर हळदीची लागवड करुन पीक घेतले. त्याची पावडर तयार करुन आपल्याच हळदीला स्वतःचा पेटंट मिळविण्यासाठी “हरिताग्राम” नावाचा ब्रेड तयार केला.
बाजारपेठेत त्याला आता चांगली मागणी होवू लागली आहे. जत शहरासह नाशिक, निफाड, सातारा व पुण्याच्या बाजारपेठेत त्यांची हळद पोहचली आहे. हे सगळे करताना त्यांनी थेट मार्केटिंगचा फंडा वापरला आहे. ३६० रुपये किलो दराने ही शुद्ध व सेंद्रिय हळद उपलब्ध करुन दिली आहे. आयुर्वेदिक औषधासाठी याची मागणी वाढली असल्याचे मिथिलेश यांनी सांगितले.
नुकतीच नवी दिल्ली येथे दुसरी आंतरराष्ट्रीय कृषी परिषद पार पडली. भारतीय कृषी संशोधन परिषदेने आयोजित केलेल्या या परिषदेत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील २७ देशाच्या व्यक्तींना आमंत्रित केले होते. ज्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, युवा शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांना विविध श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. सेंद्रिय शेतीतील प्रयोगाबद्दल मिथिलेश मालाणी यांच्या सेंद्रिय शेती व प्रयोगाची दखल घेत नोव्हेंटिव्ह फार्मर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान अॅग्रिकल्चरल रिसर्च वेल्फेअर सोसायटीचे सरचिटणीस डॉ. अनिल चौधरी, गुजरातचे राज्यपाल देवव्रत, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे माजी महासंचालक प्रा. एम. मोनी डॉ. लाखन सिंग, डॉ. संजय कुमारसिंग उपस्थित होते.