जत : जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महाराणा प्रताप चौकात असलेल्या कृषी विभागाच्या गोडावूनला अज्ञातांनी आग लावल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. आगीत कृषी विभागाचे २५ वर्षाचे रेकॉर्ड, बियाणे, निबोळी मशीन असे १ लाख २५ हजाराचे साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी कृषी पर्यवेक्षक संजय पाटसुते यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दोनच दिवसांपूर्वी जत येथे पुणे येथील विभागीय कृषी कार्यालयाचे दक्षता पथक तपासणीसाठी आले होते.
पथकातील अधिकाऱ्यांनी कौशल्याने मागील काळात झालेल्या जत कृषी विभागातील घोटाळयाची कसून तपासणी सुरू केली आहे. काही महत्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दक्षता पथक तपासणी करून परतताच ज्या गोडाऊनमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मागील २५ वर्षापासूनचे महत्वाचे रेकॉर्ड ठेवण्यात आले होते तेथेच अज्ञातांनी आग लावल्याने या आगीत महत्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले. त्याचबरोबर एक लाख किंमतीचे बियाणे, बीज प्रक्रिया साहित्य, खते, ट्रॅप्स, लुयर्स तसेच २५ हजार रुपयांची निंबोळी पावडर तयार करण्याचे मशीन व वजनकाटाही जळून खाक झाला आहे.
वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून
गोडावूनला आग लागण्याची माहिती मिळताच कृषी विभागाचे सहसंचालक उमेश पाटील, सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जतचे उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, जतचे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी घटनास्थळी पाहणी करत जत पोलीस ठाणे गाठले. दिवसभर कृषीचे अधिकारी तळ ठोकून होते.
आग लागली नाही, लावली…
जतच्या वरिष्ठ, वादग्रस्त अधिकाऱ्यांनी घोटाळे केल्याने जतमधून त्या अधिकाऱ्यांची गच्छंती झाली होती. या घोटाळ्याचा पुन्हा तपास सुरू झाला आहे. घोटाळा दाबण्यासाठीच रेकॉर्ड रुमला आग लावल्याची दबक्या आवाजात कृषी क्षेत्रात चर्चा सुरू आहे. आग लागली तेव्हा कृषी विभागातील वॉचमन व कृषी पर्यवेक्षक ज्या ठिकाणी झोपले होते तेथील खोलीला बाहेरून कडी लावण्यात आली होती. अत्यंत पद्धतशीरपणे अज्ञाताने रेकॉर्डरुम पेटवून दिली. एकूण सारे प्रकरण संशयास्पद आहे.