तासगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई : आतापर्यंत पाच आरोपी गजाआड
तासगाव : तालुक्यातील वायफळे येथील रोहित फाळके यांच्या खून प्रकरणी पाचव्या संशयित आरोपीला आज जेरबंद करण्यात आले. तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. गणेश प्रकाश मळेकर (वय 21 रा. मांगडेवाडी, कात्रज, मुळगाव मळे, ता. भोर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वायफळे (ता. तासगाव) येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहे. याच वादातून रोहित संजय फाळके याच्यावर मागील आठवड्यात खुनी हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला.
यावेळी संजय फाळके, जयश्री फाळके, आदित्य साठे, आशिष साठे व सिकंदर शिकलगार यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. या सर्वांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यासह पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वायफळे येथील घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलिसांची विविध पथके विशाल फाळके याचा शोध घेत होती. अवघ्या 24 तासात त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
आतापर्यंत त्याच्यासह पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. आतापर्यंत अटक केलेल्यांपैकी चौघांना 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला आहे. तर आज अटक केलेल्या गणेश मळेकर याला आज न्यायालयासमोर उभे केले जाईल.
गणेश मळेकर याला आज बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, अमर सूर्यवंशी, विवेक यादव, सुहास खुबीकर, संदीप गुरव, दरिबा बंडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.