जत : जत अचकनहळ्ळी रस्त्यावरील शासकिय धान्य गोडाऊन शेजारी असलेल्या अदिवाशी पारधी समाजासाठी आरक्षित केलेल्या जागेवरील अपूर्ण घरकुलांचा प्रश्न नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा आदिवासी पारधी समाजाकडून व्यक्त होत आहे. जत अचकनहळ्ळी रस्त्यावरील पूर्व बाजूला शासकिय धान्य गोडाऊन लगत असलेल्या जागेवर महाराष्ट्र सरकारने एकात्मिक अधिवाशी विकास प्रकल्पांतर्गत केंद्रशासन व राज्यशासन पुरस्कृत अधिवाशी पारधी समाज घरकुल योजना मंजूर झाली असून या योजनेंतर्गत अदिवाशी विकास विभाग केंद्र व राज्य सरकारने छत्रपती शाहू नगर, जत मंगळवेढा रोड या ठिकाणी पन्नासहून अधिक घरांचे विट बांधकाम केले आहे. यापैकी काही घरकुलांना लोखंडी दरवाजे व खिडक्या बसविल्या असून पुढील सर्व काम अर्धवट असे ठेवले आहे. तर आतील बाजूस असलेल्या घरकुलाचे विटाचे बांधकाम फक्त चौकटीपर्यंत पूर्ण झाले असून इतर कामे अर्धवट आहेत.
आदिवासी विभाग, केंद्र, राज्याचे दुर्लक्ष
आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलाकडे एकात्मिक अदिवाशी विकास विभाग, केंद्र व राज्य शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने या घरकुलाची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे घरकुलाच्या अर्धवट बांधकामात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे उगवली असून काही अर्धवट असलेल्या घरांची पडझड झाली आहे.
मंत्रालय स्तरावर आवाज उठवावा
रानावनात फिरून शिकार करून आपली व कुटुंबियांची उपजिविका भागविणाऱ्या येथिल अदिवासी पारधी समाजाकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करित असून केंद्र व राज्य शासनाने त्यांची अर्धवट अवस्थेत असलेली घरकुले त्वरित पूर्ण करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्वरीत हालचाल करुन उपेक्षित पारधी समाजाला त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी मंत्रालय स्तरावर आवाज उठवावा, अशी अपेक्षा आदिवासी पारधी समाजांकडून व्यक्त करण्यात येत आहे.