बुलढाणा जिल्ह्यातून एक आश्चर्यजनक बातमी समोर आली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बाळाच्या पोटात असणाऱ्या दोन जुळ्या बाळांचे अर्भक अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी बाहेर काढले.विशेष म्हणजे अत्यंत गुंतागुतीची असणाऱ्या या शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ.उषा गजभिये यांनी दिली.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्भवती महिलेच्या बाळाच्या पोटात अर्भक असल्याचं 28 जानेवारीला स्पष्ट झाले होते.अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या प्रकाराबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असताना, 31 जानेवारीला त्या बाळाचा जन्म बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला.
यानंतर या नवजात बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील शस्ञक्रियेसाठी हलविण्यात आलं. मंगळवारी बालरोग सर्जन डॉ.उषा गजभिये यांच्या नेतृत्वात तेथील डॉक्टरांच्या टिमने त्या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटात असणारी तीन इंचाची दोन अर्भक सव्वा तासाच्या शस्ञक्रियेनंतर बाहेर काढली.
दरम्यान या नवजात बाळाच्या पोटात आणखी बाळ असल्याचं आधीच समोर आलं होतं. बुलढाण्यावरून या बाळाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या बाळाचं अर्ध पोट चिरून त्याच्या पोटात असणारे दोन अर्भक बाहेर काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया सव्वा तासापर्यंत चालली. त्या बाळाच्या पोटात वाढलेल्या अर्भकाला दोन हात आणि दोन पाय होते. डोकं मात्र नव्हतं,दरम्यान बाळाच्या पोटात एक अर्भक असण्याच्या महाराष्ट्रात आजवर 270 केसेस समोर आल्यात. बाळाच्या पोटात जुळे अर्भक असणारी ही 33 वी केस आहे,” असं देखील डॉ. उषा गजभिये यांनी सांगितलं.