सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भारतीय जनता पक्षाकडून विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपाकडून हा एका नव्या रणनितीचा भाग आहे. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत.
पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना संपर्कप्रमुख हे नवे पद भाजपने निर्माण केलेले आहे. संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपने मोठी चाल खेळल्याची चर्चा आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचाही भाजपचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपा नेतृत्वाकडून अशा उपाय योजना करण्यात येत आहेत.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्यालेच मिळावे, असा राजकीय नेत्यांचे प्रयत्न असतो. सरकार स्थापन झाल्यानंत, असे मंत्रिपदासाठी आणि चांगल्या खात्यासाठी जसे प्रयत्न झाले तसे स्व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठीही नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. परंतु तरीही तिन्ही पक्षातले काही नेते नाराज झाले आहेत. भाजपमधील नाराजी शमविण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण केल्याचे सांगितले जाते.
पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.ज्या जिल्ह्यात पालक मंत्री अशा जिल्ह्यातही आता संपर्क मंत्री अंकुश ठेवू शकणार आहेत.