पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसंच जर विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला, तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिला आहे. कॉपी मुक्त परिक्षेसाठी मंडळ प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले.
11 फेब्रुवारी पासून 12 वीची परिक्षा सुरू होत आहे. ही परिक्षा कॉपी मुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपी मुक्त अभियानही राबवलं गेलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांना परिक्षा सुची दिली आहे. त्याचे पालन करावे असे आवाहन ही शरद गोसावी यांनी केले आहे. विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनी शांत पणे पेपर लिहावेत असंही ते म्हणाले.