इचलकरंजी: सुतनगरी असलेल्या इचलकरंजी शहरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं पत्नीच्या चेहऱ्यावर, मानेवर गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले आहेत.
यात आरोपीने तब्बल आठ वार करत १५ वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे.यात पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
दिलीप मनोहर धावोत्रे असं आरोपी पतीचं नाव आहे. तर मनीषा असं खून झालेल्या माहिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही पती पत्नी इचलकरंजी शहाराच्या स्वामी मळा परिसरात वास्तव्याला होते. दोघंही कोरोची येथील कारखान्यात वहिफणीचं काम करत होते.
दिलीप आणि मनीषा यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुलंही आहेत. पण मागील काळापासून आरोपी दिलीप आपल्या पत्नीवर चारित्र्यावरून संशय घेत होता.
शुक्रवारी मध्यरात्री याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीनं आठ वार करत पत्नीचा जीव घेतला. हे वार इतके भयानक होते की पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास आरोपी स्वत: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने अर्धवट झोपेत असलेल्या पोलिसांना उठवून हत्येची कबुली दिली.
याप्रकरणी मृत मनीषा यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. पण केवळ चारित्र्याच्या संशयातून पतीनं अशाप्रकारे पत्नीची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची अशाप्रकारे हत्या झाल्याने जोडप्याची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.